अराजपत्रित पदांची भरती प्रक्रिया ‘महाआयटी’मार्फतच होणार
Recruitment Process for Non-Gazetted Posts will be done through MahaIT
अराजपत्रित पदांची भरती प्रक्रिया ‘महाआयटी’मार्फतच होणार
लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील म्हणजेच राज्य शासनाच्या विविध विभागातील अराजपत्रित पदांची (गट ब आणि गट क) सरळसेवा भरती प्रक्रिया आता “महाआयटी’मार्फत होणार असल्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. महापरीक्षा पोर्टल पद्धतीत बदल करून आता सुधारित परीक्षा पद्धतीचा वापर करीत ही सरळसेवा भरतीप्रक्रिया महाआयटीच्या खासगी कंपनीद्वारे होणार असल्याचे स्पष्ट झाले.
महापरीक्षा पोर्टलचा अनुभव पाहता गेल्या काही महिन्यांपासून अराजपत्रित सरळसेवा भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत व्हावी, अशी मागणी होत होती. मात्र राज्य शासनाने महाआयटीमार्फत पदभरती होणार असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. याबाबतचे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कार्यक्षेत्रातील गट ब (अराजपत्रित) आणि गट क- संवर्गातील पदभरतीसंदर्भात महापरीक्षा संकेतस्थळाचा वापर करण्याबाबत 14 मार्च 2018 चे परिपत्रक अधिक्रमित करून परीक्षा प्रक्रिया राबवण्याच्या अनुषंगाने सुधारित सूचना देण्यात आल्या आहेत.
अराजपत्रित पदांची भरतीची प्रक्रिया महाराष्ट लोकसेवा आयोगाद्वारे व्हावी, अशी मागणी होती. तर दुसरीकडे ही पदभरती राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून झाली पाहिजे, अशी मागणी पुणे शहर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी प्रत्यक्ष संबंधित मंत्र्यांना भेटून केली होती. त्यासाठी “मनविसे’ने सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर मनविसेच्या मागणीला यश आले.
जिल्हा निवड समित्या, प्रादेशिकस्तरीय निवड समित्या, तसेच राज्यस्तरीय निवड समित्यांनी पदभरती प्रक्रियेबाबतच्या स्पर्धा परीक्षांसाठी यापुढे महाआयटीमार्फत समाविष्ट केलेल्या सेवा पुरवठादारांच्या यादीतून “ओमएमआर व्हेंडर’ची निवड करून परीक्षा प्रक्रिया होणार आहे. त्यासाठी संबंधित निवड समित्यांना समन्वय समिती, निवड समितीच्या अध्यक्षांना समन्वय अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहे.