PSI परीक्षा निकाल लागून वर्ष होऊनही शारीरिक चाचणी नाही
PSI MPSC Exam Result 2020
PSI MPSC Exam Result 2020 – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (एमपीएससी) मागील वर्षी पोलीस उपनिरीक्षक पदासाठी (पीएसआय) पूर्व व मुख्य परीक्षा झाली. मात्र, वर्ष लोटून अद्यापही शारीरिक चाचणी झालेली नाही. त्यामुळे दोन हजारांवर उमेदवारांना रुखरुख लागली आहे. विशेष म्हणजे, याच उमेदवारांसोबत परीक्षा दिलेल्या राज्य विक्रीकर निरीक्षक आणि साहाय्यक कक्ष अधिकारी पदाचा अंतिम निकालही जाहीर झाला आहे.
‘MPSC’ तर्फे जानेवारी २०१९ मध्ये ५५५ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये ४९६ पोलीस उपनिरीक्षक पदांसह अन्य जागा या राज्य विक्रीकर निरीक्षक आणि साहाय्यक कक्ष अधिकारी पदांसाठी होत्या. यासाठी मार्च २०१९ ला पूर्वपरीक्षा घेण्यात आली. यात उत्तीर्ण झालेल्या पाच हजार उमेदवारांची मुख्य परीक्षा ४ ऑगस्ट २०१९ मध्ये झाली. मुख्य परीक्षेचा निकाल २ मार्च २०२० रोजी जाहीर झाला. यानुसार राज्य विक्रीकर निरीक्षक आणि साहाय्यक कक्ष अधिकारी पदांसाठी मुख्य परीक्षा नसल्यामुळे त्यांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या. मात्र, पोलीस उपनिरीक्षक पदासाठी शारीरिक चाचणी आणि मुलाखत घेतली जाते. त्यामुळे मार्च २०२० ला मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यावर त्यांची शारीरिक चाचणी होऊन उपनिरीक्षक पदाची प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित होते; परंतु दहा महिने लोटूनही शारीरिक चाचणी होऊ शकली नाही. मेहनतीने परीक्षा दिल्या, शारीरिक चाचणीसाठी सराव सुरू आहे. मात्र, लेटलतिफ कारभारामुळे शारीरिक व मानसिक त्रास होत आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून समस्या सोडवावी, अशी मागणी मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी केली आहे.
MPSC Main Exam Result 2020 – मुख्य परीक्षेचा निकाल मार्च २०२० मध्ये जाहीर झाल्याच्या चार महिन्यांनंतर आयोगाने सप्टेंबर २०२० मध्ये उमेदवारांना सराव करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या पत्रानुसार शारीरिक चाचणी व मुलाखतीचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर लवकरच जाहीर करण्यात येणार असून सराव सुरू ठेवावा, असे सांगण्यात आले होते. मात्र, तीन महिन्यांपासून शारीरिक चाचणीची तारीख अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही.
करोनामुळे भरती प्रक्रियेमध्ये काही अडचणी आल्या होत्या. सध्या प्रक्रिया सुरू असून लवकरच शारीरिक चाचणी घेतली जाईल.
– प्रदीपकुमार, सचिव, राज्य लोकसेवा आयोग