खुशखबर, विद्यार्थ्यांना आता २० ऐवजी ४० टक्के क्रेडिट्स; UGC चा निर्णय
Online Courses Of Universities Can Earn Students 40 Percent Credits
खुशखबर, विद्यार्थ्यांना आता २० ऐवजी ४० टक्के क्रेडिट्स; UGC चा निर्णय
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात विद्यापीठे, कॉलेजांमधील शिक्षण ऑनलाइन सुरू होते. याचा विचार करत, उच्च शिक्षणात सध्या ऑनलाइन शिक्षणासाठी असलेले २० टक्के क्रेडिट (श्रेयांक) वाढवून ४० टक्के इतके करण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने घेतला आहे. यासाठीची नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे.
लॉकडाउन काळात देशभरातील विद्यापीठांच्या परीक्षा रखडल्या होत्या. याबाबत नेमके काय करता येईल, यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने एक समिती स्थापन केली होती. याचबरोबर पुढील शैक्षणिक वर्षाची सुरुवात नेमकी कशी करायची, त्यात कोणते शैक्षणिक पर्याय द्यायचे, या सर्वांबाबत विचार करण्यासाठी समितीची नियुक्ती करण्यात आली होती. यातील मूल्यांकनासाठी नेमलेल्या समितीने ऑनलाइन शिक्षणाला प्राधान्य देत त्यासाठी देण्यात येणाऱ्या क्रेडिटमध्ये वाढ करण्याची सूचना केली होती. सध्याच्या नियमानुसार २० टक्के क्रेडिट ऑनलाइन शिक्षणाला दिले जातात, ते ४० टक्के इतके देण्यात यावे, विद्यापीठांना ऑनलाइन क्रेडिटचा पर्याय दिला, तर परीक्षा घेणे सुलभ होईल, अशी शिफारस समितीने केली होती. यानुसार आयोगाने निर्णय घेत ऑनलाइन शिक्षणाचे क्रेडिट दुप्पट केले.
यामुळे आता विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या अभ्यासक्रमाचे ऑनलाइन शिक्षण घेता येणार आहे. यासाठी केंद्रीय शिक्षण विभागाने निश्चित केलेल्या विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर वेळोवेळी अभ्यासक्रम जाहीर केले जाणार आहेत. हे अभ्यासक्रम ४५ दिवसांचे असतील, तसेच त्याचे ऑनलाइन मूल्यांकनही केले जाणार आहे. यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन क्रेडिट दिले जाणार आहेत. हे क्रेडिट विद्यापीठाकडे सादर केल्यानंतर अंतिम निकालात ते गृहित धरले जातील, असेही आयोगोन स्पष्ट केले आहे.
ऑनलाइन उपलब्ध अभ्यासक्रमात वाढ
सध्या केंद्र सरकारतर्फे ई-पाठशाला, स्वयम्प्रभा, दीक्षा यांसारख्या अॅपमधून पूर्व प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत सुमारे ८० हजार विषयांचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. देशातील विविध विद्यापीठांनीही आता ऑनलाइन शिक्षण सुरू केले असून त्यांचे स्वत:चे अभ्यासक्रमही त्यात उपलब्ध झाले आहेत. या अभ्यासक्रमांचाही विद्यार्थ्यांना लाभ घेता येऊ शकेल, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
सोर्स: म.टा