Junior Engineer Recruitment Process – Date Extended
Junior Engineer Recruitment Process – Date Extended
अभियंता भरतीसाठी नव्याने प्रक्रिया – मुदतवाढ
Brihanmumbai 341 Junior Engineers Recruitment Online Process should be delay now. The proposal was submitted by the Municipal Administration after the Permanent Committee rejected the notification of the permanent committee to extend the online recruitment process of the junior engineers for 15 days. However, the administration was still examining the candidates.Read the below given details carefully and keep visit us for further details.
कनिष्ठ अभियंत्यांच्या ऑनलाइन भरती प्रक्रियेला १५ दिवस मुदतवाढ देण्याची स्थायी समितीची उपसूचना महापालिका प्रशासनाने धुडकावल्याने समितीने हा प्रस्ताव दफ्तरी दाखल केला. मात्र, त्यानंतरही प्रशासनाने उमेदवारांची परीक्षा घेतल्याने मंगळवारी पालिका सभागृहात जोरदार रणकंदन झाले. प्रशासन मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप करत नगरसेवकांनी सनदी अधिकाऱ्यांवर जोरदार टीका केली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी अभियंत्यांच्या भरतीसाठी पुन्हा जाहिरात प्रसिद्ध करून नव्याने भरती प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले.
पालिकेमध्ये ३४१ कनिष्ठ अभियंत्यांची ऑनलाइन भरती करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने सन २०१५मध्ये घेतला होता. त्यासाठी स्थायी समितीची सन २०१७मध्ये परवानगी घेण्यात आली होती. ही भरती प्रक्रिया नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना राबविण्यात आली. निवडणुकीच्या काळात वृत्तपत्रांमध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध केल्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांना या भरतीसाठी अर्ज करता आला नाही. त्यामुळे या प्रक्रियेला १५ दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी केली होती. मात्र, उपसूचनेची अंमलबजावणी करण्याऐवजी स्थायी समितीत उत्तर सादर केले. त्यावर स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी हा प्रस्ताव दफ्तरी दाखल केला होता.
या प्रकरणाचे तीव्र पडसाद मंगळवारी पालिका सभागृहात उमटले. राखी जाधव यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे या प्रश्नावर आवाज उठवला. या भरतीसाठी आलेला खर्च संबंधित अधिकाऱ्यांच्या वेतनातून वसूल करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली. ‘सर्वानुमते प्रस्ताव दफ्तरी दाखल केलेला असतानाही भरती प्रक्रिया राबवून सनदी अधिकारी मनमानी कारभार करीत आहेत. नियम डावलून निर्णय घेत आहेत. हे कदापी सहन करणार नाही. अशा पद्धतीने कारभार करायचा असेल तर सनदी अधिकाऱ्यांनी सरकार दरबारी परत जावे. सभागृह, स्थायी समिती आणि नगरसेवकांचा अपवान खपवून घेतला जाणार नाही’, असा इशारा स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिला.
भाजपचे नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी, ‘भरती प्रक्रियेची चौकशी करावी अशी मागणी केली नव्हती, तर केवळ १५ दिवसांची मुदतवाढ द्यावी, असे नगरसेवकांचे म्हणणे होते’, असे सांगितले. स्थायी समितीचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. ‘प्रशासनाला मनमानी कारभार करायचा असेल तर यापुढे एकही प्रस्ताव मंजूर करणार नाही. इतकेच नव्हे तर एकाही समितीची बैठक आयोजित करणार नाही’, असा इशारा सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी दिला.
‘समितीचे आदेश पाळू’
‘या भरतीसाठी ३६ हजार २१८ उमेदवारांनी अर्ज केले होते. आयत्या वेळी परीक्षा रद्द केल्यास गोंधळ उडेल अशी भीती भरती प्रक्रिया राबविणाऱ्या संस्थेने व्यक्त केली होती. त्यामुळे परीक्षा घ्यावी लागली’, असे स्पष्ट करत पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी, स्थायी समितीचे आदेश काटेकोरपणे पाळण्यात येतील, असे स्पष्ट केले.
म. टा.