इंजिनिअरींगसह सर्वच अभ्यासक्रमांना दिलासा;अॅडमिशनचा मार्गही मोकळा
Decision Of State Government To Admit Students In SEBC Category For Degree Admission
इंजिनिअरींगसह सर्वच अभ्यासक्रमांना दिलासा;अॅडमिशनचा मार्गही मोकळा
राज्य सरकारने ‘एसईबीसी’ प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या गटातून प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्याने पदविका अभ्यासक्रमासह उच्च शिक्षणातील पदवी प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा, अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, पण आरक्षणाबाबत स्पष्टता नसल्याने पुढील प्रक्रिया सुरू होईल असे उच्च व तंत्रशिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने 9 सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. राज्य सरकारने मराठा आरक्षण कायम राहिल त्यासाठी न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडली जाईल असे स्पष्ट केले. पण गेल्या अडीच महिन्यात यावर निर्णय न झाल्याने इयत्ता ११वीपासून ते पदव्युत्तर पदवीच्या प्रवेशावर ;प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता.
गेल्या महिन्यात राज्यातील विद्यापीठांनी पदवी व पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊन त्यांचे निकाल जाहीर करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे पुढील प्रवेशाबाबत प्रक्रिया सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती. तसेच पुढील काही दिवसात इंजिनिअरींग, फार्मसीच्या सीईटीचा निकाल जाहीर होणार असून, त्याची प्रवेश प्रक्रिया सुरू करणे गरजेचे आहे. पाॅलिटेक्नीक, आयटीआय प्रवेशही खोळंबले आहेत. त्यामुळे अखेर राज्य सरकारने ‘एसईबीसी’ प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या गटातून प्रवेश घेण्यासंदर्भात आदेश काढला आहे, असे अधिकार्यांनी सांगितले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी म्हणाले, “राज्य शासनाने काढलेल्या आदेशाचा आम्ही अभ्यास केला आहे. त्यातील गाईड लाइनचे तंतोतंत पालन करून पुणे विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल.”
राज्य सरकारने काढलेल्या आदेशामुळे पदवी व पदव्युत्तर चे प्रवेश प्रक्रिया लवकर पूर्ण करता येईल थोडा विलंब झाला असला तरी आता हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे त्यामुळे पुढचे नुकसान टळेल.