मुक्त शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन रखडले
Evaluation Of Open Education Board Students Stalled
मुक्त शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन रखडले
शैक्षणिक वर्षांतील नोंदणीबाबतही अद्याप मंडळाकडून चित्र स्पष्ट करण्यात आलेले नाही
राज्यात नव्याने स्थापन झालेल्या मुक्त शिक्षण मंडळातील दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांचे गेल्या शैक्षणिक वर्षांतील मूल्यमापनच झालेले नाही. त्याचप्रमाणे या शैक्षणिक वर्षांतील नोंदणीबाबतही अद्याप मंडळाकडून चित्र स्पष्ट करण्यात आलेले नाही.
रोज प्रत्यक्षात शाळेत जाऊन शिकणे शक्य नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्यात दीड वर्षांपूर्वी मुक्त शिक्षण मंडळ सुरू करण्यात आले. त्याअंतर्गत दहा वर्षे पूर्ण झालेले विद्यार्थी पाचवीची, तेरा वर्षे पूर्ण झालेले विद्यार्थी आठवीची परीक्षा देऊ शकतात. गेल्या शैक्षणिक वर्षांत (२०१९-२०) पाचवीसाठी ४५ आणि आठवीच्या परीक्षेसाठी १३९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा शैक्षणिक वर्षांचे कामकाज विस्कळीत झाले. परिणामी, मुक्त शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापनही रखडले आहे. मंडळाने पालकांना मूल्यमापन कधी, कसे करणार याची कल्पना दिलेली नाही.
पालकांमध्ये उत्सुकता..
ऑनलाइन वर्गाच्या माध्यमातून हे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात आले आहे. साधनांच्या उपलब्धतेनुसार विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व स्तरांतून प्रयत्न करण्यात येत आहेत. मुक्त शिक्षण मंडळाच्या भरवशावर असलेली मुले, पालक, प्रौढ विद्यार्थी याला अपवाद ठरले आहेत. यंदाची नोंदणी कधी सुरू होणार याबाबत मंडळाने काहीच स्पष्ट केलेले नाही. यंदा पालक आणि शाळांमधील शुल्क वाद विकोपाला गेला आहे. त्यामुळे मुक्त शिक्षण मंडळाबाबत पालकांमध्ये उत्सुकता आहे. गृहशिक्षणाकडे पालकांचा कल वाढला आहे, मात्र यंदा मंडळाचे कामकाज चालणार का याबाबतच संभ्रम आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२० मधील दहावी-बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर मुक्त विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते, मात्र करोना प्रादुर्भावामुळे हे शक्य झाले नाही. याबाबत लवकरच निर्णय जाहीर करण्यात येईल. त्याचप्रमाणे शैक्षणिक वर्षांचेही मंडळाचे नियोजन जाहीर करण्यात येईल.
सोर्स:लोकसत्ता