पदवी प्रवेश प्रक्रिया नव्याने होणार;
Degree College Admission 2020-21
पदवी प्रवेश प्रक्रिया नव्याने होणार; मराठा आरक्षण अंतरिम निकालाचा परिणाम
राज्यातले विविध विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांमधील शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता झालेले पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश पुन्हा नव्याने होणार आहेत. मराठा आरक्षण प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम निकालानंतर ही कार्यवाही राज्य सरकारने केली आहे. राज्याच्या शिक्षण संचालकांनी विद्यापीठांना पदवी प्रवेश प्रक्रिया नव्याने राबवण्याचे आदेश दिले आहेत.
मराठा आरक्षण प्रकरणातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी अंतरिम निकाल दिला आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरिता पदव्युत्तर पदवी वगळता अन्य कोणत्याही अभ्यासक्रमाच्या प्रवेशांमध्ये मराठा आरक्षण देता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश नव्याने करावे लागणार आहेत. प्रक्रिया नव्याने राबवण्याचे आदेश दिले आहेत.
‘मराठा आरक्षण कायद्यांतर्गत पदव्युत्तर पदवी वैद्यकीय अभ्यासक्रमांचे जे प्रवेश झाले आहेत त्यावर कोणताही परिणाम होणार नाही. मात्र, २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी यापुढे होणाऱ्या सर्व शिक्षण प्रवेशांत मराठा आरक्षण लागू करू नये. त्याचप्रमाणे सरकारी व सार्वजनिक सेवांतील नोकऱ्यांतही या आरक्षणाचा लाभ देऊ नये’, असा आदेश न्या. एल. नागेश्वर राव, न्या. हेमंत गुप्ता व न्या. एस. रवींद्र भट यांच्या पीठाने बुधवारी अंतरिम निकालात दिला. तसेच २०१८मध्ये राज्यघटनेत झालेल्या १०२व्या सुधारणेमुळे आरक्षणाच्या संदर्भात काही महत्त्वाचे कायदेशीर प्रश्न निर्माण झाल्याने आरक्षण विरोधातील सर्व अपिले सुनावणीसाठी घटनापीठाकडे वर्ग करण्याची विनंती पीठाने सरन्यायाधीशांना केली.
उच्च शिक्षण संचालकांच्या आदेशाची प्रत पुढीलप्रमाणे –
उच्च शिक्षण संचालकांच्या आदेशाची प्रत
या निकालानंतर राज्यातील पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया आता नव्याने राबवण्यात येणार आहे.
सोर्स:म. टा